आयुष्यातील अनिश्चितता आणि आयुष्याला घडवू किंवा बिघडवू शकणारा एखादा चुकीचा (किंवा योग्यही) निर्णय तुमचे भविष्य ठरवू शकतो, हे सार्वत्रिक-सार्वकालिक असलेलं सूत्रच ‘बिटरस्वीट लाइफ’मागे आहे. हे सूत्र जवळजवळ विसरून ‘बिटरस्वीट लाइफ’ चं ‘आवारापन’ नावाचं जसंच्या तसं असूनही भयंकर झालेलं रूपांतर बॉलिवूडमध्ये येऊन गेलं.
पंकज भोसले
-----------------------------------------------------------------------------
सध्या दक्षिण कोरियन सिनेमा जगभरातील सिनेमांवर मोठय़ा प्रमाणावर आपला प्रभाव पाडताना दिसत आहेत. बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडची उसनवारी करण्यात धन्यता मानणाऱ्या कोरियन चित्रपट सृष्टीत दशकभरापूर्वीपासून एकाएकी बदलाचे वारे वाहू लागले. नव्या कोरियन दिग्दर्शकांच्या पिढीने देशातीलच गुन्हेगारी, आर्थिक चढ-उतार, उत्तर कोरियाशी असलेले तणावपूर्ण संबंध यातून निर्माण झालेल्या प्रश्नांवरचे विषय घेऊन चित्रपट बनवायला सुरुवात केली. हे चित्रपट हिंसा आणि सेक्सला बेधडकपणे, प्रसंगी रंजितपणे पडद्यावर मांडू लागले आणि विशेष म्हणजे प्रेमकथांबाबतच्या ठराविक फॉम्र्यूलेबाज चौकटीही त्यांनी उद्ध्वस्त केल्या. त्यातून निर्माण झालेल्या नव्या चित्रप्रकाराने हॉलीवूडच्या ‘मिरामॅक्स’, ‘ड्रीमवर्क्स’ आणि वॉर्नरसारख्या मातब्बर स्टुडियोजचे वितरण आणि रुपांतरणासाठी लक्ष वेधून घेतले. ‘माय सॅसी गर्ल’ नावाच्या चित्रपटाने २००१ साली कोरिअन बॉक्स ऑफिसवर ‘न भूतो न भविष्यती’ कमाई करून दाखविली. या चित्रपटावरून आपल्याकडे ‘फ्रेम टू फ्रेम’ बनविण्यात आलेला ‘अग्ली और पगली’ हा चित्रपट अजिबात
चालला नाही. (अन् हॉलीवूडचा त्याचा अधिकृत रिमेकही फार नाव कमावू शकला नाही.) पण त्यांच्या २००७साली आलेल्या ‘हॅपी लाईफ’ची, कॉलेज संपल्यावर विखूरलेल्या चार मित्रांनी अनेक वर्षांंनी आपल्या ‘म्यूझिक बँड’साठी एकत्र येण्याची मूळ कल्पना घेऊन आपल्याकडे फरान अख्तरने ‘रॉक ऑन’ हा उत्तम सिनेमा केला. (ऋण जरी मान्य केले नसले, तरी ‘रॉक ऑन’ उत्तम चित्रपट आहे, हे नाकारताच येत नाही.) संजय गुप्ताच्या जिंदाचं मूळ हे ‘ओल्डबॉय’ या सध्या हॉलिवूड करीत असलेल्या कोरियन रुपांतरातच आहे. आणखीही काही कोरिअन सिनेमे आडवाटेने आपल्याकडे आलेत, येऊ घातले आहेत. हॉलिवूडने तर ‘माय सॅसी गर्ल’पासूनच्या अनेक दक्षिण कोरियाई चित्रपटांचे हक्कच विकत घेतले आहेत. उग्र, अतिभडक, तांत्रिकदृष्टय़ा बॉलीवूडपेक्षा अधिक संपन्न, प्रसंगी अतिभावनाशील या प्रकारात मोडू शकणाऱ्या चित्रपटांचे विषय वैविध्यपूर्ण आहेत. हे सर्व चित्रपट आज डीव्हीडी लायब्रऱ्यांमध्ये (किंवा मुंबई, ठाणे, पुण्यातल्या रस्त्यांवरही अधिक प्रमाणात) इंग्रजी ‘सबटायटल्स’सह उपलब्ध असल्याने आपल्या प्रेक्षकांपर्यंत सहज पोहचू शकतात. ‘ईरॉटीक’,‘क्राईम-थ्रिलर असलेले सूडपट’ आणि ‘रोमॅण्टिक कॉमेडी’ असं या डीव्हीडीजचं वर्गीकरण करता येईल. या संग्रहातूनच जी-वून किम या दिग्दर्शकाचा ‘बिटरस्वीट लाईफ’ नावाचा एक सुंदर चित्रपट हाती आला. हा चित्रपट दक्षिण कोरियाच्या चित्रपटांची खासियत बनलेल्या सूडपटांच्या मार्गाने जाताना काही अंशी प्रेमकथेचाही वापर करतो म्हणून वैशिष्टय़पूर्ण ठरलाच, शिवाय हॉलिवूड ते बॉलिवूड (त्याबाबत पुढे येईलच) या चित्रपटाचे चाहते दिग्दर्शकही निर्माण झाले. ‘बिटरस्वीट लाइफ’ ची गोष्ट आहे पंचतारांकित हॉटेल चालविणाऱ्या आणि अंडरवर्ल्ड डॉन असलेल्या मिस्टर कांग(किम येंग चेऊल) याच्याकडे काम करणाऱ्या सन वू (जिआँग मिन वाँग) या अत्यंत प्रामाणिक सहकाऱ्याची. सन वू देखभाल करीत असलेले हॉटेल सर्वाधिक नफा मिळवून देणारे असल्यामुळे कांग त्याच्यावर भलताच खूष आहे. दुश्मनांसाठी क्रूरकर्मा ठरणाऱ्या आपल्या स्वभावामुळे कांगने दिलेली कोणतीही मोहीम फत्ते करण्यासाठी म्हणून सन वू ओळखला जातो. योगायोगाने मिस्टर कांगच्या आयुष्यात नव्याने एक समस्या निर्माण होते. आपली नवी प्रेयसी दुसऱ्या कुणाच्यातरी प्रेमात पडल्याचा संशय कांगचा मनात निर्माण झालेला असतो. त्याची शहानिशा करण्याची जबाबदारी मग ओघानेच सन वूवर येऊन पडते.सन वू मग कांगच्या प्रेयसीची ओळख काढून पुढले काही दिवस तिच्या नकळत तिच्या मागावर राहतो. या पाठलागादरम्यान अचानक समोरासमोर झालेली भेट, सोबत घेतलेलं जेवण यातून सन वूच्या मनात कांगच्या प्रेयसीबाबत सहानुभूती निर्माण होते. थोडय़ाशा संपर्कातून आलेली ही सहानुभूती तिचा प्रियकर असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्या दोघांना मारून टाकण्याच्या कांगच्या आदेशाला विसरण्यास कारणीभूत ठरते. ही गोष्ट कांगपर्यंत पोहोचल्यानंतर कांग आपल्याला फसविणाऱ्या सन वूलाच मारून टाकण्याचे फर्मान सोडतो. कांगकडे अनेक वर्षे प्रामाणिकपणे चाकरी करणारा सन वू कांगच्या या निर्णयाने मानसिकरीत्या पुरता हादरून जातो. आपल्या जिवावर उठणाऱ्या कांगच्या सर्व चेल्यांचा खात्मा करत कांगवर सूड उगवण्याचं ठरवतो. ‘सिम्पथी फॉर व्हेन्जनन्स’ आणि ‘ओल्डबॉय’ या चित्रपटांनी कोरियन सूडपटांना जागतिक ओळख मिळवून दिली. त्यातील रक्तबंबाळ हिंसाचार आणि अंगावर येणारी मारधाड यांचा ‘बिटरस्विट लाइफ’मध्ये मोठय़ा प्रमाणावर अंगीकार झालेला दिसतो. शिवाय ‘बिटरस्वीट..’ त्यातील व्यक्तिरेखेच्या वागण्याची कारणेही खोलात शोधण्याचा प्रयत्न करतो. (सिम्पथी फॉर व्हेन्जनन्समध्येही हाच दृष्टिकोन ठेवण्यात आला होता.) सन वूची सुरुवातीपासूनच निर्माण होणारी प्रतिमा ही अत्यंत क्रूरकर्मा अशी आहे. ती तशी निर्माण व्हावी यासाठी दिग्दर्शक कथानकात आवश्यक त्या जागा निर्माण करतो. पुढे कांगच्या प्रेयसीविषयी सन वूला वाटणारी सहानुभूती ही अव्यक्त प्रेमाच्याच स्वरूपात स्पष्ट होते. सन वू तिला वाचविण्यासाठी कांगशी गद्दारी करण्याचा निर्णय घेतो. पण हा निर्णय त्याच्यासाठी शोकांतिकादेखील बनणारा असू शकतो. आयुष्यातील अनिश्चितता आणि आयुष्याला घडवू किंवा बिघडवू शकणारा एखादा चुकीचा (किंवा योग्यही) निर्णय तुमचे भविष्य ठरवू शकतो, हे सार्वत्रिक-सार्वकालिक असलेलं सूत्रच ‘बिटरस्वीट लाइफ’मागे आहे. हे सूत्र जवळजवळ विसरून ‘बिटरस्वीट लाइफ’चं ‘आवारापन’ नावाचं जसंच्या तसं असूनही भयंकर झालेलं रुपांतर बॉलिवूडमध्ये येऊन गेलं. यातील काही गाणी बऱ्यापैकी गाजल्यामुळे हा चित्रपट अजूनही लक्षात असण्याची शक्यता आहे. मूळ चित्रपटात आधीच पुरेसा मेलोड्रामा असताना त्याच्या रुपांतरात बॉलिवूड छापाच्या मेलोड्रामाचा अतिरेक करून, कथानकाला धार्मिक बाबींची जोड देऊन चित्रपटाला अतिबटबटीत करण्याचा प्रयत्न महेश भट कॅम्पातील दिग्दर्शक मोहित सुरीने केला. वर नायकाला पारंपरिक बॉलिवूडी हीरो बनवण्याच्या नादात इमरान हाश्मीची व्यक्तिरेखा तयार करण्यात आली आहे,आणि त्याला ठिगळाप्रमाणे नवं कथानकही जोडलेलं आहे. संपूर्णपणे परदेशात चित्रीकरण करून आपल्या प्रेक्षकांना (अजूनपर्यंत फारसा माहिती नसलेला कोरियन सिनेमा मारून) एका भन्नाट विषयावरचा, वेगळा चित्रपट देण्याची दिग्दर्शकाची बहुधा इच्छा असावी. बॉलिवूडमध्ये रूपांतरासाठी खरंतर ‘बिटरस्वीट लाईफ’ हा चांगला सिनेमा होता. पण दिग्दर्शकाने त्यात आपल्या डोक्यातील अनावश्यक माल-मसाला भरून चित्रपटाच्या विषय आणि आशयातील गंभीरपणाच नष्ट करून टाकला. बिटरस्वीटमधून टोकाच्या पातळीवरचा हिंसाचार वगळता जसेच्या तसे (उच्च उर्दू भाषांतरात) उचललेले संवाद आणि दृश्ये आवारापनमध्ये आपल्या प्रेक्षकांनाही रुचणं अशक्य आहे. कारण बिटरस्वीट एक सूडपट आहे, त्यात प्रेमकथेचा वापर असला तरी तो उघडपणे आलेला नाही. तर आवारापन सूडापेक्षा अधिक प्रेमकथेचं चऱ्हाट लांबवत राहतो. ज्यांनी आवारापन पाहिला असेल, त्यांनी तुलनेसाठी ‘बिटरस्वीट लाइफ’ नक्की पाहावा. अन् हे दोन्हीही चित्रपट न पाहिलेल्यांनी शक्यतो आवारापनच्या वाटेला न जाता, बिटरस्वीट लाईफलाच पहिलं प्राधान्य द्यावं. बॉलिवूडइतकी प्रचंड संख्येने चित्रनिर्मिती दक्षिण कोरिया करू शकत नाही. त्यासाठी लागणाऱ्या साधनांची मुबलकता केवळ भारतातच आहे. पण भारतीय चित्रपटाकडे दुर्दैवाने चांगल्या असलेल्या स्वतंत्र (किंवा स्वतंत्र असलेल्या चांगल्या म्हणू हवं तर) कल्पनांचा मोठा दुष्काळ आहे. दक्षिण कोरियातील ‘जॉईंट सिक्युरिटी एरिया’, ‘माय सॅसी गर्ल’, ‘व्हेन्जनन्स’ चित्रत्रयी, ‘मोमेंट टू रिमेम्बर’, ‘माय वाईफ इज गँगस्टर’ हे आपल्याकडे फारसे कष्ट न घेता मिळवता येणाऱ्या चित्रपटांचे विषय पाहिल्यास त्यांनी चित्रपट बनवताना अंगीकारलेला स्वतंत्र दृष्टीकोन लक्षात येईल. त्यानिमित्ताने कोरियन सिनेमाने आपल्या चित्रपटांमध्ये नक्की असे काय बदल केले, की तुलनेने अल्प प्रमाणात चित्रनिर्मिती असूनही त्यांची मागणी एकाएकी जगभरात मोठय़ा प्रमाणात वाढली, याचं उत्तर आपल्याला मिळू शकेल. हे चित्रपट पाहायला सुरुवात करण्यासाठी ‘बिटरस्वीट लाईफ’ ही कायमच उत्तम निवड असेल. कोरियन सिनेमाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी तर नक्कीच!
pankaj.bhosale@gmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment