Tuesday, April 28, 2009

मराठी शब्देविणु संवाद!

आपल्याला म्हणजेच इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठीच्या पुस्तकात 'मराठीची कहाणी' असा
धडा होता. त्यात लेखकाने मराठीच्या जन्माचे रंजक वर्णन केले आहे. खरंच! अशीच आहे आपली मराठी भाषा! आपण आपल्या भाषेस मायबोली किंवा मातृभाषा असे म्हणतो. पण खरेच आपण आपल्या मायबोलीचा म्हणजेच आपल्या आईचा मान राखतो का? हल्लीच्या युगात इंग्रजी बोलता येणे, लिहिता येणे यावाचून गत्यंतर नाही. इंग्रजी तर आलेच पाहिजे. जगाची भाषा ना ती! पण हे सगळे करत असताना आपल्या आईस विसरून कसे चालेल? मराठी तर नीट बोलता आलंच पाहिजे. आपल्या 'माय' मराठीवर इंग्रजीचे अतिक्रमण होत आहे. मी माय हा शब्द अवतरण चिन्हात का लिहिला हे तुमच्या लक्षात आले असेलच. त्याचा खरा अर्थ आहे माय . आता तुम्ही विचाराल की अतिक्रमण कसे काय बुवा होत आहे? तर तुम्ही खालील वाक्ये वाचा. व्यवहारातीलच वाक्ये आहेत हे तुम्हाला कळेलच. हा मराठी शब्देविणु संवादु आहे. दोन भावा-बहिणींमधला. भाऊ : अगं, तुझी एक्झाम आहे ना! स्टडी स्टार्ट कर नाहीतर फेल होशील. बहीण : अरे हा एवढा कम्प्युटरचा गेम फिनिश करते आणि स्टार्ट करते माझे होमवर्क. तू का मला डिस्टर्ब करतो आहेस? जा तुझे काम कर. नाहीतर गेट लॉस्ट माझ्या रूममधून! खरेतर त्यांना, त्यांना असे म्हणावयाचे होते की, भाऊ : अगं तुझी परीक्षा जवळ आली आहे ना! मग अभ्यासाला बैस. नाहीतर नापास होशील! बहीण : अरे हा एवढा संगणकावरचा खेळ संपवते आणि मग बसते अभ्यासाला. तू का माझे लक्ष विचलित करतो आहेस? तू तुझे काम कर. जा, चालता हो माझ्या खोलीतून! मोठ्या भावास असे उलटून बोलणे बरोबर नाही. असो. मराठी शब्दांऐवजी इंग्रजी प्रतिशब्द जोडून मराठीची गोडी घालवणे योग्य नाही. अशाने मराठी पार बेचव होऊन जाते. आणखी काही वाक्ये पहा! ही वाक्ये माझ्या ओळखीच्या लोकांचीच आहेत. हा त्यांच्या आणि माझ्यामधील संवाद आहे. माझ्या चुलत बहिणीशी साधलेला हा संवाद पहा. बहिण : ए आज मी तुला स्कूलमध्ये ड्रॉप करायला येऊ का? माझ्या स्कुटीवरून ड्रॉप करेन तुला स्कूलमध्ये. मी : नको तुला कशाला त्रास? मी जाईन चालत! हाकेच्या अंतरावर तर आहे शाळा. जेमतेम नऊ-दहा मिनिटे तर लागतात तिथं पोहोचायला. बहिण : वॉकिंग डिस्टन्सवर आहे तुझी स्कूल? आय नेव्हर न्यू धीस! मग तुझ्या स्कूलपर्यंत मी कंपनी करते. ही सारे वाक्ये ऐकून मला हापूस आंब्याच्या आमरसात सॉस घातल्यासारखे किंवा श्रीखंडात चीजचा किस घातल्यासारखे वाटले. ई वॅक् थू थू : पण हे सगळे विचार माझ्या मनातले आहेत. मी लगेच माझ्या चुलत बहिणीस म्हटले, ''अग तू इंग्रजी माध्यमातून शिकणारी असून किती अशुद्ध इंग्रजी बोलतेस?'' तिला काहीच कळले नाही. मी पुढे म्हटले, ''अगं यात कितीतरी मराठी क्रियापदे आहेत.'' घरात हंशा पिकला. तिलासुद्धा मला काय म्हणावयाचे आहे ते कळले, पण थोड्या वेळानंतर! मराठीच्या जमिनीवर इंग्रजीचे गवत उगवले आहे. इंग्रजीला मराठी भाषेत येऊ द्यायलाच नको. प्रत्येक भाषेचे स्वतंत्र अस्तित्व हवे. आता आणखी वाक्ये पहा. मी शाळेतून घरी येत असताना काही तरुणांमधील संवाद माझ्या कानावर पडला. ते बहुतेक महाविद्यालयातील असावेत. तरुण (१) - तुला त्या नोट्स मिळाल्या का? अरे त्या अकाऊंटस्च्या. तरुण (२) - आय डीड नॉट गेट एनी नोटस्. ते सोड तू पिक्चरला येणार का मला कंपनी द्यायला? तरुण (१) - नाही. मला आज पॉसिबल होणार नाही रे. आज इव्हिनिंगला आम्ही आमच्या नेटीव्ह प्लेसला जाणार आहोत म्हणजे आऊट ऑफ स्टेशन. आमचे व्हिलेज कोकणमध्ये आहे (कोकणात नव्हे!). तिथे माझ्या कझिनचे वेडिंग आहे. अरेरे! हीच आहे का आपल्या मराठीची अवस्था! पण कशामुळे? प्रसारमाध्यमे, चित्रपट यांच्यामुळे! शाळा महाविद्यालयातील मुले मुली यांचा मराठी बिघडवण्यात सिंहाचा वाटा आहे. मराठीची दुरावस्था पाहून फार वाईट वाटतं. असे वाटते की मराठी भाषा मृत झाली तर संस्कृत भाषेसारखी! कल्पनासुद्धा किती भयंकर आहे! नाही नाही. मराठी भाषा जिवंत ठेवलीच पाहिजे. मराठी शुद्ध बोलता आलेच पाहिजे. त्यात हिंदी अथवा इंग्रजी प्रतिशब्द नकोत. इंग्रजी बोलतानासुद्धा त्यात मराठी शब्द नकोत. मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवणे हे आपल्याच हातात आहे. आपण जर मराठी नीट बोललो तर अमृताशी पैजा जिंकणारी मराठी भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल यात शंका नाही. - पुष्कर नागपूरकर दहावी, व्ही. एन. सुळे गुरुजी विद्यालय, दादर

No comments:

Post a Comment